सांगवी बु. गावात नागरिकांनी नदीपात्रात उतरून केली स्वच्छता!ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांमध्ये संताप


तालुका प्रतिनिधी : 

सांगवी बु|| — गावातील नदीपात्रात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात कचरा आणि घाण साचलेली असून, ग्रामपंचायतीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी स्वतः पुढाकार घेऊन स्वच्छता मोहीम राबवली आहे.
नदीपात्रात साचलेल्या घाणीमुळे डेंगू, मलेरिया आणि इतर साथीचे आजार पसरू शकतात, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामपंचायतीकडे कचराकुंड्यांची योग्य व्यवस्था नसल्यामुळे तसेच स्वच्छतेसाठी असलेला ट्रॅक्टर वापरात न आणल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

ग्रामपंचायतीच्या निष्क्रियतेविरोधात डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील तरुणांनी एकत्र येऊन नदीपात्र स्वच्छ करण्याचा निर्धार केला. या स्वच्छता मोहिमेत चंदू तायडे (मिस्त्री), सागर मेघे, अजय मेघे, विकास तायडे, समा तायडे,दीपक भालेराव,अजय सोनवणे,राहुल जयकर ,तसेच अनेक समाजसेवक आणि ग्रामस्थ उत्साहाने सहभागी झाले.

स्वच्छता मोहिमेनंतर नागरिकांनी ग्रामपंचायतीला इशारा दिला की, जर तत्काळ कारवाई करून नियमित स्वच्छतेची व्यवस्था केली नाही, तर नदीपात्रातील कचरा थेट ग्रामपंचायतीच्या दालनात टाकण्यात येईल, असा कठोर इशारा सागर मेघे यांनी दिला आहे.

नागरिकांनी शासनाकडेही मागणी केली आहे की स्वच्छ भारत मिशनअंतर्गत मिळणारा निधी योग्य पद्धतीने वापरला जावा आणि सांगवी बु|| ग्रामपंचायतीकडून नियमित स्वच्छता मोहीम राबवली जावी.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने