चतुर्थ श्रेणी नाकारताच महसूल सेवकाचा हृदयविकाराने मृत्यू संपूर्ण महसूल सेवक वर्गात हळहळ – शासनाने तत्काळ निर्णय घ्यावा,

रावेर (प्रतिनिधी) :
 सजा थेरोळा, ता. रावेर, जि. जळगाव येथील महसूल सेवक श्री. गोपाल बेलदार (वय अंदाजे 29) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. नुकतेच मुंबई येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणीचा लाभ नाकारण्यात आल्याची माहिती मिळताच हा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.



स्व. गोपाल बेलदार हे महसूल सेवक संघटनेच्या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवणारे, कार्यतत्पर आणि निष्ठावंत अधिकारी होते. तब्बल महिनाभर नागपुर येथील संविधान चौकात येथे सुरू असलेल्या आंदोलनात ते प्रत्यक्ष सहभागी झाले होते. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आंदोलन स्थळी भेट देऊन चतुर्थ श्रेणी देण्याचे आश्वासन दिल्याने महसूल सेवकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र, दि. 16 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत सचिवांनी ‘महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी देता येणार नाही’ असे स्पष्ट केल्याची माहिती मिळताच, श्री. बेलदार यांना तीव्र मानसिक धक्का बसला. काही क्षणांतच त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

स्व. बेलदार हे अविवाहित होते. त्यांच्या भावाने सांगितले की, “गोपाळ मुंबईच्या बैठकीला जात होता. चतुर्थ श्रेणी मंजूर झाल्यावर बँकेचे कर्ज काढून घर बांधायचे त्याचे स्वप्न होते. पण बँकेने देखील किमान पंचवीस हजार रुपये पगार असेल तरच कर्ज मिळेल आणि शासनाने नकार दिल्यानंतर त्याने खूप तणाव घेतला आणि त्याचा जीव गेला.”

या घटनेमुळे महसूल सेवक वर्गात तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे. संघटनेने शासनाला मागणी केली आहे की, “आता तरी शासनाने महसूल सेवकांचा न्यायाने विचार करून त्यांना चतुर्थ श्रेणी मंजूर करावी,” तसेच स्व. गोपाल बेलदार यांच्या कुटुंबास तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी.

महसूल सेवक संघटनेच्या वतीने सांगण्यात आले की, “आम्ही एक समर्पित आणि कर्तव्यनिष्ठ सहकारी गमावला आहे. ही घटना संपूर्ण महसूल विभागासाठी अत्यंत दुःखद आहे.


1 टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा
थोडे नवीन जरा जुने