हजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या दर्ग्यावर श्रद्धा, एकता आणि संगीताचा संगम
कोरपावली येथिल सर्वधर्मीय ऐक्याचे जिवंत प्रतीक असलेल्या हजरत पिर गैबंशाह वली (रहे.) यांच्या सालाबादप्रमाणे होणाऱ्या उर्स निमित्त कोरपावली येथे भव्य कव्वाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू–मुस्लीम तडवी पंच कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमामुळे परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या दर्ग्याला भेट देणाऱ्या भाविकांची दृढ श्रद्धा आहे की येथे मनोभावे केलेली प्रार्थना नक्कीच फळाला येते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी आणि उर्स सोहळ्यात सहभागी होण्यासाठी उत्साहाने दाखल होत आहेत.
उर्स निमित्त दि. 29 डिसेंबर (सोमवार) रोजी संदल तर दि. 30 डिसेंबर (मंगळवार) रोजी भव्य कव्वाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या दिवशी देशभरात प्रसिद्ध असलेले कव्वाल-ए-फनकार इंतजार साबरी (उत्तर प्रदेश) आणि कव्वाली साहिबा, टीव्ही सिंगर करिष्मा ताज (नागपूर) यांचा रंगतदार कव्वाली मुकाबला होणार असून, रसिकांसाठी ही एक अविस्मरणीय पर्वणी ठरणार आहे.
संगीत, भक्ती आणि अध्यात्म यांचा संगम साधणाऱ्या या कव्वाली महोत्सवात परिसरातील भाविकांनी व सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी व कव्वालीच्या सुरेल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन तडवी हिंदू–मुस्लीम पंच कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
कोरपावलीतील हा उर्स सोहळा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नव्हे, तर हिंदू–मुस्लीम एकतेचा, सामाजिक सलोख्याचा आणि सांस्कृतिक समृद्धीचा भव्य उत्सव असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.