फैजपूरमध्ये आगळावेगळा आणि आदर्श विवाह सोहळा!लेवा समाजात धांगडधिंगा प्रथांना फाटा – वारकरी दिंडीसोबत नववधू-वरांचा मंगल सोहळा


फैजपूर (ता. यावल) –
 लेवा समाजात प्रथमच पारंपरिक धांगडधिंगा, डीजे, बँड आदी गोंगाटी प्रथांना पूर्णतः फाटा देत एक आगळावेगळा आणि समाजासाठी आदर्श ठरणारा विवाह सोहळा फैजपूरमध्ये दिनांक १६ नोव्हेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.
हिंगोणे (ता. यावल) येथील मूळ रहिवासी आणि जेडीसीसी बँकेचे दिवंगत अधिकारी स्व. रमेश दगडू वारके (मु. फैजपूर) यांचे सुपुत्र प्रतीक वारके यांचा विवाह खिर्डी खुर्द येथील वासुदेव झेंडू झांबरे यांची सुपुत्री गुणवंती झांबरे यांच्यासोबत अत्यंत पारंपरिक आणि संस्कारपूर्ण वातावरणात पार पडला.

विवाहाचे वैशिष्ट्य : धांगडधिंगा नाही, वारकरी दिंडीसोहळा मात्र शानदार!

या विवाहाची सर्वात मोठी खासियत म्हणजे—
👉 डीजे, बँड, महागडे लाइट-सेट, धांगडधिंगा… काहीही नाही!
👉 त्याऐवजी शेगाव येथील वारकरी मंडळींच्या कीर्तन-भजनाच्या आशीर्वादासह दिंडीचा सुंदर सोहळा आयोजित करण्यात आला.
👉 नवरदेव खिल्लारी बैलगाडीतून श्रीराम मंदिर, फैजपूर येथून प्रस्थान करून खंडोबा वाडी देवस्थान येथे पारंपरिक दिंडीसोहळ्यातून वरात निघाली.

या दिंडीमध्ये फैजपूर शहरातील नागरिक, परिसरातील लेवा समाज बांधव तसेच विविध संत-मंडळी उत्साहाने सहभागी झाले. शिस्तबद्ध, भाविकतेने भारलेली आणि संस्कारमय अशी ही वरात पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी उसळली होती.

फैजपूर परिसरात कौतुकाचा विषय बनलेली वरात

या आगळ्या-वेगळ्या आणि संस्कारशील विवाह सोहळ्याची चर्चा दुसऱ्या दिवशी संपूर्ण फैजपूर परिसरात जोरदार रंगली. “फालतू खर्च, महागडे डीजे आणि गोंगाटापेक्षा असा साधा, शांत आणि आध्यात्मिक विवाहच अधिक आदर्श आहे,” अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली.

समाजासाठी आदर्श उपक्रम

या विवाहातून लेवा समाजासह संपूर्ण समाजासाठी एक आदर्श संदेश देण्यात आला आहे—
✔ अनावश्यक खर्च टाळा
✔ संस्कृती, परंपरा आणि अध्यात्म यांचा सन्मान करा
✔ विवाहात साधेपणा आणि सद्भाव जपावा

वारकरी परंपरेच्या मंगल वातावरणात झालेला हा विवाह फारच अनुकरणीय असून “समाजाने असा संस्कारमय विवाह अंगीकारावा,” अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने