यावल नगरपरिषद निवडणुकीत अर्जविक्रीला उत्साह — दाखल मात्र शून्य!


यावल प्रतिनिधी
यावल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशीही एकाही उमेदवाराचा अर्ज प्रशासनाकडे दाखल झाला नसला तरी, अर्जविक्रीला मात्र उत्साह दिसून येत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक पदासाठी तब्बल 15 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या ऑनलाईन प्रणालीवर आठ इच्छुकांनी नोंदणी केली असून, तरीही प्रत्यक्षात एकाही उमेदवाराने तहसील कार्यालयात अर्ज सादर केलेला नाही.

पाच दिवस शिल्लक — चुरस वाढतेय!
अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ पाच दिवसांचा अवधी राहिला आहे. दरम्यान, नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून सौ. रोहिणी फेगडे आणि सौ. दीपाली बारी या दोघींची नावे चर्चेत आहेत. तसेच विविध प्रभागांतून 15 नगरसेवक इच्छुकांनीही नामनिर्देशनपत्रांची खरेदी केली आहे.

नगरपालिका कार्यालयासमोर "एक खिडकी" योजनेअंतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी उमेदवारांची गर्दी वाढू लागली आहे. निवडणुकीची प्रक्रिया वेगाने पुढे जात असतानाच, उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या टप्प्यात खऱ्या अर्थाने राजकीय तापमान वाढण्याची शक्यता आहे.

तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया अद्याप सुरूच आहे.

पुढील काही दिवसांत कोण उमेदवार रिंगणात उतरणार, याकडे यावल शहरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने