यावल तालुका प्रतिनिधी
यावल तालुक्यात २ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठी मोहीम राबवत गुन्हेगारीवर प्रभावी अंकुश आणला आहे. शांततेत, निर्भय वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी यावल पोलिसांनी संपूर्ण शहरात तसेच तालुक्यात कडेकोट नाकेबंदी, तपासणी मोहीमा आणि कोंबिंग ऑपरेशन्सची मालिका सुरू केली.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार आणि फैजपूर विभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली या कारवाईचे नियोजन करण्यात आले. विशेषतः संवेदनशील भागांमध्ये ५ पोलीस अधिकारी आणि ५ विशेष पथकांकडून एकाचवेळी धाड टाकण्यात आल्या. संशयितांचे घरे, अड्डे आणि पूर्वइतिहास असलेल्या गुन्हेगारांच्या हालचालींची कसून पडताळणी करण्यात आली.
मोहीमेदरम्यान यावल शहर आणि परिसरातील विविध गावांमध्ये वाहन तपासणी, संशयितांची चौकशी आणि घरांची चोख तपासणी करण्यात आली. या धडक कारवाईत धारदार शस्त्रे, तलवारी आणि गुन्ह्यात वापरले जाणारे काही साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणण्याची शक्यता असलेल्या ५० पेक्षा अधिक व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील चौकशीसाठी यावल पोलिस ठाण्यातुन यावल न्यायालयात हलविण्यात आले आहे.
पोलिसांच्या या जलद आणि व्यापक मोहिमेने निवडणुकीच्या सुरक्षा व्यवस्थेला मोठे बळ मिळाले आहे. मतदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये आणि निवडणूक पूर्णपणे शांततेत पार पडावी, यासाठी ही कारवाई अत्यंत निर्णायक ठरल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
यावल शहरातील नागरिक आणि ग्रामस्थांनी पोलिसांच्या या तत्परतेचे स्वागत केले असून, सर्वांनी मिळून शांततापूर्ण निवडणुकीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले आहे.
प्रतिक्रिया : पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे
सध्या आगामी जळगाव जिल्ह्यातील यावल नगरपरिषद त्याचप्रमाणे जिल्हा परिषद निवडणुकांच्या अनुषंगाने आज दिनांक 21 नोव्हेंबर 2025 रोजी यावल पोलीस स्टेशन अंतर्गत एस डी पी ओ श्री अनिल बडगुजर सर यांच्या मार्गदर्शनात व देखरेखीखाली कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आले सदर कोंबिंग ऑपरेशन मध्ये यावल पोलीस स्टेशन सह फैजपूर रावेर व निंभोरा पोलीस स्टेशनचे मिळून पाच अधिकारी व 39 कर्मचारी यांनी सहभाग घेतलेला असून कोंबिंग दरम्यान आम्ही आता पावितो कोर्टात हजर न झालेल्या 15 जामीन पत्र वॉरंटातील आरोपींना अटक केलेली असून त्यांना कोर्टात पाठवलेले आहे त्याचप्रमाणे जामीन पत्र वारंटातील आरोपी यांची बजावणी केलेली आहे तसेच शरीराविरुद्ध व माला विरुद्ध दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या 21 गुन्हेगारांना तसेच दारूबंदीच्या सदराखाली दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या नऊ आरोपींना पोलीस स्टेशनला बोलवून त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे पोलीस स्टेशन हद्दीतून हद्दपार केलेले तसेच रेकॉर्डवरील एसटीशीटर्स यांना देखील चेक करण्यात आलेले आहे आगामी निवडणुका या भयमुक्त व शांततापूर्ण वातावरणात पार पाडाव्या व गुन्हेगारांमध्ये वचक राहावा हाच या कोंबिंग ऑपरेशन मागचा खरा उद्देश होता
