जळगाव प्रतिनिधी
यावल-रावेर तालुक्यातील नागरिकांना ‘मोतीबिंदूमुक्त’ करण्याच्या उद्दिष्टाने आ. अमोल जावळे यांनी सुरू केलेला आरोग्य उपक्रम गतीमान झाला आहे. त्यांच्या पुढाकारातून रविवारी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या नेत्रशल्यचिकित्सा विभागात तब्बल 20 ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदू शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
सर्व शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात आल्या. रुग्णांना घरी पोहोचण्यासाठी मोफत सोय उपलब्ध करून देण्यात आली. यामुळे उपचार घेतलेल्या ज्येष्ठ नागरिकांसह त्यांच्या कुटुंबीयांनी मोठ्या समाधानाने समाधान व्यक्त केले.
या उपक्रमात डॉ. प्रवीण पाटील, डॉ. दिव्या सोनवणे, डॉ. सोबिया अन्सारी, डॉ. स्वाती असोले, डॉ. मयुरी राठोड, डॉ. प्रियांका पाटील, डॉ. विवेक सोलंकी, डॉ. मयुरेश डोंगरे, अनंत लांडगे या नेत्रतज्ञासह परिसेविका सुनिता वक्ते भाग्यश्री ढाकणे, सागर कोळी, मयुरी हिवरे, या परिचारकांचे मोलाचे सहकार्य लाभले.मंत्री गिरीश महाजन वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे आरोग्यदूत पै. शिवाजी रामदास पाटील, यांनी मोठा सहभाग नोंदवला.
आमदार अमोल जावळे यांनी यावेळी सांगितले की, “गरीब व दुर्बल कुटुंबातील अनेक ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक अडचणींमुळे नेत्र उपचार मिळत नाहीत. या शस्त्रक्रियेमुळे त्यांना पुन्हा दृष्टी प्राप्त झाली आहे. ‘मोतीबिंदूमुक्त यावल-रावेर तालुका’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अशा शिबिरांचे आयोजन पुढेही सातत्याने करण्यात येईल.”