यावल :
यावल नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी आपल्या पत्नी सौ. छायाताई पाटील यांच्यासह आज अधिकृतपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे यावलच्या राजकारणात नवी समीकरणं आकार घेण्याची चिन्हं दिसत आहेत.
माजी नगराध्यक्ष पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे लोकसभा प्रमुख म्हणून कार्यरत होते. मागील काही दिवसांपासून त्यांनी शहरात जोरदार जनसंपर्क मोहीम राबवून प्रत्येक मतदाराशी संवाद साधण्यावर भर दिला होता. यंदा नगराध्यक्षपदासाठीची जागा महिला राखीव असल्याने, त्यांच्या सौभाग्यवती छायाताई पाटील या उमेदवारीच्या शर्यतीत उतरतील, तर अतुल पाटील स्वतः प्रभाग क्र. ११ मधून नगरसेवक म्हणून रिंगणात उतरणार असल्याचे समजते.
अनेक दिवसांपासून ते कोणत्या पक्षाच्या किंवा चिन्हाच्या माध्यमातून निवडणूक लढवणार, याबाबत तर्कवितर्कांना उधाण आले होते. मात्र आज त्यांनी अधिकृतपणे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश करून सर्व तर्कांना पूर्णविराम दिला आहे. त्यामुळे आता पाटील दांपत्य ‘मशाल’ या चिन्हावरून निवडणुकीत लढणार असल्याचे निश्चित झाले आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या आज झालेल्या बैठकीत नगराध्यक्षपदाची जागा शिवसेना (उबाठा) कडे राखण्यात येणार असून नगरसेवक पदांमध्ये घटक पक्षांना योग्य वाटा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
या प्रवेशामुळे यावलच्या स्थानिक राजकारणात नवीन चर्चेला उधाण आले असून, आगामी निवडणुकीत पाटील दांपत्याचा प्रभाव आणि महाविकास आघाडीचे समीकरण यामुळे स्पर्धा अधिक रंगतदार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.