यावल : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या न्हावी ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा महिलांचा झेंडा फडकणार आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या पंचवार्षिक आरक्षणात न्हावी सरपंच पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव ठरले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत न्हावीच्या सरपंचपदाची माळ एका महिलेला गळ्यात पडणार हे निश्चित झाले आहे.
न्हावी ग्रामपंचायतीची स्थापना १७ फेब्रुवारी १९४१ रोजी झाली असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनच ही ग्रामपंचायत राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. गावाने कै. दादासाहेब जे. टी. महाजन यांच्या रूपाने गृहराज्यमंत्री पदही भूषविले आहे.
सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीकरिता जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणात न्हावीचा सरपंच पदाचा कोटा सर्वसाधारण महिलेसाठी जाहीर झाला आहे.या आधी गावाने सलग पंधरा वर्षे महिला सरपंच पाहिल्या आहेत.
प्रथम महिला सरपंच सौ. लीना सुनील फिरके (२८-१२-२००७ ते २५-१२-२०१२) –
सौ. आरजू सरफराज तडवी (२६-१२-२०१२ ते २३-१२-२०१७) एस.टी. आरक्षणातील महिला
सौ. भारती नितीन चौधरी (२४-१२-२०१७ ते २४-१२-२०२२) प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच
प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच त्यांनंतर सध्या देवेंद्र भानुदास चोपडे (२५-१२-२०२२ पासून) हे पहिल्या लोकनियुक्त पुरुष सरपंच म्हणून कार्यरत आहेत. मात्र, आता पुन्हा एकदा नेतृत्वाची धुरा महिलेकडेच जाणार आहे.या आरक्षणामुळे गावातील पुरुष राजकारण्यांमध्ये मिसळलेली नाराजी आणि महिला वर्गात उत्साह याचा प्रत्यय सध्या येत आहे. काही इच्छुक पुरुष उमेदवारांच्या स्वप्नांवर पाणी फिरल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक राजकीय घराण्यांतील महिला आता या संधीचा लाभ घेण्यासाठी तयारीला लागल्या आहेत.
न्हावी ग्रामपंचायतीमध्ये एकूण १८ सदस्य कार्यरत असतात. यामध्ये १७ सदस्य हे विविध प्रभागांतून निवडून येतात व एक सरपंच थेट लोकनिवडीतून. गावाचे सरपंचपद अत्यंत प्रतिष्ठेचे समजले जाते. गाव मोठे असल्याने समस्या व प्रश्नही मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सरपंचपद ही एक काटेरी माळ समजली जाते.
न्हावी ग्रामपंचायतीची पुढील पंचवार्षिक निवडणूक डिसेंबर २०२७ मध्ये होणारअद्याप जवळपास २.५ वर्षांचा कालावधी निवडणुकीसाठी शिल्लककोणते नेतृत्व पुढे येणार? कोणत्या महिला उमेदवार रिंगणात उतरणार? यावर साऱ्या राजकीय घडामोडी अवलंबून असणार आहेत या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळात न्हावीच्या राजकारणात महिलांची भूमिका अधिक प्रबळ होणार आहे, हे निश्चित.