जनतेच्या आशीर्वादात छाया पाटील उद्या स्वीकारणार यावल नगरपालिकेची सूत्रे

यावल | प्रतिनिधी

नुकत्याच पार पडलेल्या यावल नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या नूतन लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. छाया अतुल पाटील या उद्या सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी जनआशीर्वाद रॅली काढून नगराध्यक्षपदाची अधिकृत सूत्रे स्वीकारणार आहेत.

दि. २ डिसेंबर रोजी पार पडलेल्या या निवडणुकीत महाविकास आघाडीने यावल नगरपालिकेत भक्कम बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीत नगराध्यक्षपदी सौ. छाया अतुल पाटील विजयी झाल्या असून, महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शेख निसार शेख हमीद, शालुबाई भालचंद्र भालेराव, शाहीनबी शेख रज्जाक, कमरूनिसा शेख सैफुद्दीन, सईदाबी शेख हकीम मोहम्मद, रुबीनाबी उमर कच्छी असे सहा नगरसेवक निवडून आले आहेत. तसेच शिवसेना (उबाठा) कडून सागरकुमार सुनील चौधरी व सौ. वैशाली निलेश बारी हे दोन नगरसेवक विजयी झाले असून, एकूण आठ नगरसेवक महाविकास आघाडीकडून निवडून आले आहेत.

दरम्यान, उद्या सोमवार दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नगराध्यक्ष सौ. छाया पाटील यांच्या निवासस्थानापासून पदग्रहण व जनआशीर्वाद रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीनंतर सौ. छाया पाटील यावल नगरपालिकेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षपदाची सूत्रे औपचारिकरित्या स्वीकारणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या सूत्रांकडून देण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने