व्हॉट्सॲपवर बदनामी प्रकरण : माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा नोंद

यावल प्रतिनिधी
यावल नगरपरिषद निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. छाया अतुल पाटील तसेच प्रभाग क्रमांक 11 (ब) मधील नगरसेवक पदाचे उमेदवार व माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांची बदनामी करून त्यांच्या मतांवर परिणाम करण्याच्या उद्देशाने व्हॉट्सअॅपवर पोस्ट प्रसारित केल्याप्रकरणी यावल पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
तक्रारीनुसार, माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी यावल पोलिस स्टेशनला दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, ‘यावल तालुका विचारवंत’ या व्हॉट्सअॅप ग्रुपवर एका अज्ञात व्यक्तीने “शहरातील नगरपालिकेच्या भूखंडाचा श्रीखंड खाणारा कोण?” असा मथळा देत सातबाऱ्याचा उतारा पोस्ट केला. या माध्यमातून राजकीय हेतूने बदनामी करून त्यांच्या आणि सौ. छाया पाटील यांच्या प्रतिमेला धक्का देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. पोस्टचा उद्देश निवडणुकीत त्यांचे मत कमी करून राजकीय नुकसान करणे असा असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंद केला असून तपास सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, प्रचाराचे निकाल आणि निवडणुकीतील वातावरण यावरही चर्चा रंगू लागली आहे.

दरम्यान, पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले असता काही समर्थकांकडून “हाती घोडे, तोफ, तलवारी, फौज तो तेरी सारी है… पर जंजीर में जकड़ा राजा मेरा अब भी सब पे भारी है” असे बोलले जात असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता आहे, तसेच यावल नगरपरिषद निवडणुकीत आमदार-खासदार-मंत्री यांचे लक्ष आहे, अशा परिस्थितीत राजकीय नुकसान करण्याच्या हेतूनेच ही पोस्ट टाकल्याचा आरोप अतुल पाटील यांनी केला आहे.

सदर प्रकरणातील आरोपी अद्याप अज्ञात असून, पोलिस तपासानंतर पुढील कारवाई होणार आहे. यावल निवडणुकीत आधीच चुरस वाढलेली असताना या घटनेमुळे प्रचाराच्या मर्यादा आणि सोशल मीडियावरील राजकीय प्रहार यावर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने