यावल तालुक्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची संपूर्ण तयारीपत्रकार परिषदेत तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर यांची माहिती

यावल प्रतिनिधी

यावल नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महसूल व पोलीस प्रशासनासह नगरपरिषदेची सर्व तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर यांनी दिली. यावल नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली असून, सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांनी या आचारसंहितेचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार नाझिरकर यांनी यावेळी केले.

निवडणुकीदरम्यान नागरिकांच्या माहितीसाठी विविध माहिती कक्ष तयार करण्यात आले असून, या कक्षांमधून मतदारांना आणि उमेदवारांना सर्व आवश्यक माहिती मिळणार आहे. उमेदवारी अर्ज सादर करताना आणि स्वीकारताना कार्यालयात अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.

तहसीलदार नाझिरकर यांनी नामनिर्देशन पत्र ऑनलाइन भरणे, अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया, उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, मतदान केंद्रांची आखणी, ईव्हीएम व बॅलेट युनिटचे नियोजन, मतदान अधिकारी नेमणूक, आणि उमेदवारांच्या खर्चाबाबतच्या अटी व शर्ती यांची सविस्तर माहिती दिली.

यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस तसेच होमगार्ड यंत्रणा सज्ज आहे. तसेच परवानाधारक शस्त्रधारकांनी आपली शस्त्रे पोलीस ठाण्यात जमा केल्याची माहितीही त्यांनी दिली.

निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासन सतत दक्ष राहील, असेही निरीक्षक धारबडे यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने