यावल तालुका प्रतिनिधी : किरण तायडे
चितोडा (ता. यावल) येथे दि. ६ रोजी सकाळच्या सुमारास "अज्ञात इसमाचा खून करून मृतदेह शेतात टाकण्यात आला" अशी अफवा परिसरात पसरली. ही बातमी चितोडा, अट्रावल, डों, कठोरा, सांगवी व हिंगोणा गावांमध्ये वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली.
गावातील पोलीस पाटील तसेच काही ग्रामस्थांनी तत्काळ संबंधित परिसरातील शेतशिवारात जाऊन पाहणी सुरू केली. बराच वेळ शोध घेतल्यानंतर अशी कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे ती केवळ अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
या अफवेने काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सत्य समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास टाकला. स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि शंका असल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे.