हककसोड पत्र दस्त मिळण्यासाठी ५ हजारांची मागणी; यावलचे दुय्यम निबंधक अडचणीत जिल्हाधिकाऱ्यांकडे व अँटी करप्शन ब्युरोकडे लेखी तक्रार

 यावल न्यूज  : हर्षल आंबेकर 

तालुक्यातील सांगवी बु. येथील रहिवासी दीपक छगन कोळी यांनी दस्त नोंदणी प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करत यावलच्या दुय्यम निबंधकाविरोधात जिल्हाधिकारी, जळगाव व अँटी करप्शन ब्युरो (ACB) यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.


तक्रारीनुसार, दीपक कोळी यांनी २ सप्टेंबर २०२५ रोजी सांगवी बु. येथील घर व जागेचा विनामोबदला हक्क सोडपत्र दस्त नोंदविला होता. मात्र, नोंदवलेला दस्त प्राप्त करण्यासाठी ते ३ सप्टेंबर रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असता, संबंधित अधिकाऱ्यांनी "दस्त देण्यासाठी ५ हजार रुपये द्या, अन्यथा दस्त मिळणार नाही," असा आग्रह धरल्याचे त्यांनी आरोपपत्रात नमूद केले आहे.

विशेष म्हणजे, कोळी यांच्या सोबत त्या वेळी संबंधित स्टॅम्प वेंडर आणि त्यांचे मित्र आकाश तायडे उपस्थित होते. त्यांच्यासमोरच ५ हजार रुपयांची लाच मागण्यात आली, असा स्पष्ट उल्लेखही तक्रारीत करण्यात आला आहे.

तक्रारीत असेही म्हटले आहे की, दुय्यम निबंधक यांनी "ही रक्कम अँटी करप्शन ऑफिस व जिल्हाधिकारी कार्यालयासाठी द्यावी लागते," असा अप्रत्यक्ष इशारा देत शासकीय यंत्रणांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला आहे.

दीपक कोळी यांनी सदर तक्रार शपथपत्रासह सादर करत संबंधित अधिकाऱ्यावर त्वरित शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या ही बाब जिल्हा प्रशासन व अँटी करप्शन विभागाच्या चौकशीअंती पुढे जाते की नाही, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने