यावल न्यूज : बॉम्बे हायकोर्टाचे सुप्रसिद्ध वकील अॅड. शरद सोनवणे यांनी यावल येथे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. या संवादादरम्यान त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात यश मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध कौशल्यांची आणि रणनीतींची माहिती दिली.
अॅड. सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना वाढती स्पर्धा, शहरी व ग्रामीण भागांतील साधनांची असमानता, आणि माहितीच्या उपलब्धतेतील अंतर या आव्हानांचा सामना कसा करावा, यावर प्रकाश टाकला. "कठोर परिश्रम, स्मार्ट तयारी आणि सातत्य या त्रिसूत्रीच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते आणि स्वप्नपूर्ती साधता येते," असा ठाम विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये जागवला.
त्यांनी अभ्यासाचे योग्य नियोजन, वेळेचे महत्त्व आणि वेळेच्या प्रभावी व्यवस्थापनावर भर दिला. "टाइम बाउंडेड अभ्यास, ठराविक अभ्यास योजना आखणे आणि तिचे काटेकोर पालन करणे हे यशाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरते," असे ते म्हणाले. अभ्यासाचा दररोज ठराविक वेळ देऊन त्याचा शिस्तबद्ध आणि एकाग्रतेने उपयोग केल्यास यश नक्कीच गाठता येते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अॅड. सोनवणे यांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना आत्मपरीक्षण, नियोजन आणि सातत्याच्या महत्त्वाची जाणीव करून देणारे ठरले. उपस्थित परीक्षार्थ्यांनीही त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.