यावल न्युज :
यावल शहरात घडलेल्या सहा वर्षीय गोंडस बालकाच्या हत्येच्या प्रकरणात मोठा धक्कादायक तपशील उघड झाला आहे. पोलिसांच्या तपासामध्ये या प्रकरणात लैंगिक अत्याचार झाल्याचे निष्पन्न झाल्याने आता गुन्ह्यात बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पॉस्को अंतर्गत कलमांची भर घालण्यात आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.
दि. ५ सप्टेंबर रोजी शहरातील बाबुजीपुरा भागातील सहा वर्षीय मुलगा बेपत्ता झाला होता. ईद-ए-मिलादच्या सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त झाली होती. दुसऱ्याच दिवशी दि. ६ सप्टेंबर रोजी शेजारी राहणाऱ्या संशयित आरोपी शेख शाहिद शेख बिस्मिल्ला (वय २२) याच्या घरात मुलाचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. या घटनेने संपूर्ण जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
बालकाचे आजोबा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यावल पोलिसांनी संशयित शेख शाहिद याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तातडीने कारवाई केली. सदर आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यास दि. १५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
दरम्यान, यावल ग्रामीण रुग्णालयात करण्यात आलेल्या शवविच्छेदन अहवालानुसार बालकावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून, त्यातूनच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. या धक्कादायक निष्कर्षानंतर पोलिसांनी गुन्ह्यात पॉस्को कायद्याअंतर्गत कलमे दाखल करून तपास अधिक गतीमान केला आहे.
पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख व सहकारी कसून तपास करत आहेत. आरोपी पोलीस कोठडीत पोपटासारखा बोलू लागल्याने अनेक महत्वाची माहिती समोर येत असल्याचे सुत्रांकडून कळते. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा समावेश होतो का, याकडे शहरासह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.