यावल न्यूज ; हर्षल आंबेकर
सांगवी बु., जळगाव – शिक्षण आणि समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल श्री पंकज मोतीराम भंगाळे यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल आदर्श शिक्षक पुरस्कार – 2025 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सरदार वल्लभभाई पटेल बहुउद्देशीय विकास संस्था, जळगाव आणि रोटरी क्लब ऑफ जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला असून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला.
श्री भंगाळे हे केवळ शिक्षक म्हणून नव्हे तर समाजासाठी कार्यरत असलेले मार्गदर्शक आहेत. सांगवी गावात त्यांनी 2018 पासून “पाणी अडवा – पाणी जिरवा” आणि “झाडे लावा – झाडे जगवा” या पर्यावरणीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. श्रमदान आणि आर्थिक व्यवस्थापनाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळत त्यांनी ग्रामविकासाला हातभार लावला.
ते विविध शैक्षणिक कार्यक्रमांचे व्याख्याते व सूत्रसंचालक आहेत, कीर्तनकार म्हणून सेवा देतात, वारकरी भजन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन व आर्थिक हिशोब सांभाळतात. भजनी मंडळात गायन-वादन सेवा, NCC ऑफिसर म्हणून जबाबदाऱ्या पार पाडताना त्यांनी एड्स जनजागृतीसाठी स्वतंत्र समूह तयार करून मार्गदर्शन केले आहे.
त्यांच्या या सर्वसमावेशक कार्याची दखल घेऊन त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल प्रकाश मंडळाचे पदाधिकारी, ज्योती विद्यामंदिर सांगवी बु., ज्योती प्राथमिक विद्यामंदिर सांगवी बु. तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले