“नऊ दिवसांपासून महसूल सेवक संपावर; सेवा पंधरवड्यात शेतशिवार रस्ते योजनेत अडचणी, शासनाकडून कानाडोळा”

राज्यात सेवा पंधरवडा निमित्त शेतशिवार रस्ते पानंद योजना राबविण्यात येत आहे. मात्र गावगाड्यातील महसूल कामकाजाचा कणा समजला जाणारा (कोतवाल )महसूल सेवक हे मागील नऊ दिवसांपासून नागपूर येथील संविधान चौकात चतुर्थ श्रेणी मागणीसाठी कामबंद आंदोलन आणि साकळी उपोषण करत आहेत.
प्रत्येक शेतकऱ्याचा गट नंबर, शेताची जागा, रस्त्याची माहिती, गावातील गल्लीबोळ याची अचूक माहिती ठेवणारे महसूल सेवक संपावर असल्यामुळे सेवा पंधरवडा कार्यक्रम राबवताना महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

राज्यातील विविध तहसील कार्यालयांकडून जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असले तरी महसूल सेवक संपामुळे कामात अडथळे निर्माण झाले आहेत. आंदोलनाचा विचार करून शासनाने तातडीने मागण्या मान्य कराव्यात, अशी मागणी महसूल विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच शेतकरी वर्गाकडून होत आहे.

परंतु कुंभकर्णी झोपेत गेलेल्या शासनाने नऊ दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे महसूल सेवकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. लवकरच मागण्या मान्य न झाल्यास बोंबाबोंब आंदोलन तसेच मुंडन आंदोलन करण्यात येणार असल्याचे समजते.

शासनाने त्वरित दखल घेऊन आंदोलन मागे घेण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने