यावल न्युज : किरण तायडे
महाराष्ट्र शासन, जिल्हाधिकारी जळगाव व प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार यावल तालुक्यात “सेवा पंधरवडा” विशेष उपक्रम तीन टप्प्यांत राबविण्यात येणार असल्याची माहिती यावल तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर यांनी दिली. तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी या संदर्भातील सविस्तर माहिती दिली.
योजना पुढीलप्रमाणे टप्प्यांमध्ये राबवली जाणार आहे –
पहिला टप्पा : १७ ते २२ सप्टेंबर २०२५
दुसरा टप्पा : २३ ते २७ सप्टेंबर २०२५
तिसरा टप्पा : २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५
या कालावधीत महसूल थकबाकी मुक्ती मोहीम, जिवंत सातबारा, जिवंत रेशन कार्ड, शेत सुलभ योजना, पानंद रस्ते दुरुस्ती, दफनभूमी व स्मशानभूमींचे विषय, महासमाधान शिबिर, शेतकरी आत्महत्या प्रभावित कुटुंबांना शासनाचे सर्व लाभ, तसेच महाविद्यालयीन शिबिरांतून विविध दाखले वितरण या सेवांचा समावेश असेल.
याशिवाय, वर्ग २ ते वर्ग १ रुपांतरण, सामाजिक अर्थसहाय्य योजना, तसेच मुद्दा क्रमांक ११ अंतर्गत आवश्यक कार्यवाही केली जाणार आहे.
यावल तालुक्यातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा थेट व जलद लाभ मिळावा, तसेच प्रशासकीय सेवांचा लोकांपर्यंत प्रभावी पोहोच व्हावा यासाठी हा “सेवा पंधरवडा” उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे तहसीलदार सौ. मोहनमाला नाझिरकर यांनी सांगितले.