आदर्श विद्यालय, दहिगांवचे माजी मुख्याध्यापक कै. एम. डी. नारखेडे सरांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

यावल तालुका । दहिगांव येथील आदर्श विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक व जनता एज्युकेशन सोसायटी, दहिगांवचे संचालक कै. एम. डी. नारखेडे (वय 85) यांचे आज दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी भाषण करत असताना हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.
कै. नारखेडे सर हे कर्मनिष्ठ, शिस्तप्रिय, उत्तम प्रशासक तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात होते. आपल्या दीर्घ कारकिर्दीत त्यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी अपार मेहनत घेतली. शिस्त, स्वच्छता, सुविधा विकास, तसेच अध्यापनाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष देऊन त्यांनी आदर्श विद्यालयाला एक नवा दर्जा मिळवून दिला होता.

आज शाळेत हुशार विद्यार्थ्यांना रोख बक्षिसे देण्यासाठी धनादेश सुपूर्द करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात त्यांच्या सत्काराचाही समावेश होता. मार्गदर्शन करताना त्यांनी संत तुकारामांचे अभंग व गोविंदाग्रजांचे साहित्य यातील उदाहरणे देऊन शिक्षक पेशाचे महत्व अधोरेखित केले. याच वेळी त्यांना हृदय विकाराचा झटका आला आणि त्यांच्या प्राणज्योती मालवली.

त्यांच्या अकस्मात निधनाने संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या जाण्याने एक कर्तव्यनिष्ठ, प्रेरणादायी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना शिक्षक व विद्यार्थ्यांत व्यक्त केली जात आहे.

कै. नारखेडे सरांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, हे दुःख सहन करण्याचे बळ ईश्वर त्यांना देवो, अशी प्रार्थना जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आबासाहेब सुरेश देवराम पाटील, संचालक मंडळ तसेच आदर्श विद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी व्यक्त केली आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने