हिंगोणा प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य बिघडले कर्मचारी व सुविधा नसल्याने ग्रामस्थांचा संताप

यावल न्युज : हर्षल आंबेकर
Hingona health primary hospital news यावल तालुका । हिंगोणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सेवेच्या नावाने अकार्यक्षम स्थिती निर्माण झाली असून ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करण्यासाठी काही महिलांना या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी आरोग्य केंद्रात एकही वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी किंवा शिपाई हजर नसल्याचे समोर आले. त्यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

प्राथमिक आरोग्याच्या या सर्व घटनेसंबंधी स्थानिक नागरिक यांनी व्हिडिओ शेअर केला आहे

आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची सुविधा नसून बसविण्यात आलेला ‘आरओ’ फिल्टर गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. याशिवाय केंद्राच्या आवारात मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने विषारी साप व इतर सरपटणारे प्राणी यांचा धोका वाढला आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, हे केंद्र ग्रामीण भागातील लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचे असूनही त्याकडे संबंधित अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहेत. सुट्टीच्या दिवशीही आवश्यक ते कर्मचारी उपस्थित राहणे अपेक्षित असतानाही प्रत्यक्षात परिस्थिती उलट असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

ग्रामस्थांनी वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांनी तातडीने या केंद्राला भेट देऊन आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने