यावल न्युज :
यावल न्यायालयात आज राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले असून या लोकअदालतीत जमीन महसूल व RRC थकबाकीदारांकडून वसुलीसाठी मंडळनिहाय नियोजन करण्यात आले. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
यावेळी मा. श्री. निवृत्ती गायकवाड, प्रभारी उपविभागीय अधिकारी फैजपूर, तहसीलदार सौ. मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे, मंडळ अधिकारी बी. एम. पवार, ग्राम महसूल अधिकारी तसेच महसूल कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकअदालत पार पडल्यानंतर प्रशासनाकडून मिळालेल्या प्राथमिक आकडेवारीनुसार एकूण ३५० प्रकरणांमध्ये भरणा झाला असून ४,०४,०६४ रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली आहे. या वसुलीमुळे शासनाच्या महसूल उत्पन्नात भर पडली असून, थकबाकीदारांनाही दिलासा मिळाला आहे.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अशा लोकअदालतीतून थकबाकीदारांना आपली थकबाकी एकाच ठिकाणी सोयीस्करपणे फेडता येते, तसेच शासनाची वसुली प्रक्रिया अधिक गतीमान होते. पुढील काळातही अशा लोकअदालतींचे आयोजन करून प्रलंबित महसूल थकबाकी वसुलीवर भर देण्यात येणार असल्याचे प्रभारी एस.डी.ओ. यांनी सांगितले.