यावल न्युज : मुंबई/जळगाव | दि. ५ ऑगस्ट:
Aapla Dawakhana enquiry News जळगाव जिल्ह्यातील “आपला दवाखाना”, वर्धनी केंद्र व शहरी आरोग्य केंद्रांत झालेल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणाची SIT (विशेष तपास पथक) मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भीम आर्मी भारत एकता मिशनच्या शिष्टमंडळाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्याकडे मंत्रालयात भेट घेऊन केली.
या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई व्हावी, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, वर्धनी केंद्र व शहरी आरोग्य केंद्र या योजना १५व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून राबवण्यात येतात. या योजनांसाठी केंद्र व राज्य शासनाकडून आलेल्या कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचे गंभीर आरोप आहेत. हा निधी नागरिकांच्या आरोग्यसेवेसाठी असूनही त्याचा गैरवापर झाल्याची चर्चा जनतेमध्ये जोरात सुरू आहे.
या प्रकरणात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्यावर थेट सहभागाचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
१४ जून २०२४ रोजी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली असून SIT मार्फत चौकशीची मागणी करण्यात आली होती. मात्र अद्याप कोणतीही चौकशी किंवा शिस्तभंगाची कारवाई न झाल्याने हे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.
या आंदोलनात्मक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर, जर तातडीने कारवाई झाली नाही तर १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.
या वेळी शिष्टमंडळात भीम आर्मी भारत एकता मिशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष गणेश भाऊ सपकाळे, जुनेद शेख, श्रीकांत वानखेडे, भुसावळ तालुकाध्यक्ष जावेद शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.