ई-पिक पाहणी ॲप सर्व्हर डाऊन – शेतकरी त्रस्त, मुदतवाढीची मागणी

यावल न्युज : हर्षल आंबेकर
E peek pahani server down जळगाव : राज्य शासनाच्या ई-पिक पाहणी ॲपमधून शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांची नोंदणी करून द्यायची असते. याच आधारे शासकीय नुकसानभरपाई, पिकविमा, अनुदान अशा महत्त्वाच्या योजनांचा लाभ मिळतो. मात्र सध्या ॲपचा सर्व्हर वारंवार डाऊन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
यंदा पिक पाहणीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या शेतात जाऊन ॲपवर पिकांची माहिती भरत आहेत. मात्र सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने नोंदी पूर्ण होत नाहीत. शेतकऱ्यांना वारंवार शेतामध्ये फेऱ्या माराव्या लागत असून वेळ, श्रम आणि पैसा वाया जात आहे.

ई-पिक पाहणीची नोंदणी न झाल्यास शेतकऱ्यांना भविष्यातील नैसर्गिक आपत्तीतील नुकसानभरपाई, शेतकरी विमा योजनांचा लाभ तसेच विविध शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी शासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, ई-पिक पाहणीसाठी ॲपचा वेग तातडीने वाढवावा. तसेच १५ सप्टेंबर ही अंतिम मुदत वाढवून शेतकऱ्यांना नोंदणीसाठी पुरेसा वेळ द्यावा. शासनाच्या योजनांचा खरा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ॲप तांत्रिक अडचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढणे आवश्यक असल्याची मागणी शेतकरी संघटनांनी केली आहे.

शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ॲप व्यवस्थित सुरू करून मुदतवाढ जाहीर करावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने