यावल न्युज : हर्षल आंबेकर
E peek pahani server down यावल : शेतकऱ्यांच्या ई-पिक पाहणी प्रक्रियेत सातत्याने तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने महसूल विभागातील तलाठी व शेतकरी यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविषयी यावल तालुका तलाठी संघातर्फे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, 2025-26 या वर्षाकरिता DCS ॲपद्वारे ई-पिक पाहणी नोंदी कराव्या लागत आहेत. मात्र १ ऑगस्टपासून सुरु असलेल्या या प्रक्रियेत ॲप वारंवार निकामी होत असून शेतकरी व महसूल कर्मचारी यांचे मोठे नुकसान होत आहे. १४ सप्टेंबरपर्यंत मुदत असताना केवळ ३ दिवसच अॅप योग्यरित्या चालले आहे, असे नमूद करण्यात आले.
प्रमुख समस्या:
1. प्रत्यक्ष शेतात जाऊनही MAP GPS LOCATION योग्य प्रकारे दाखवत नाही.
2. पेरा नोंदणी करताना उपलब्ध क्षेत्राऐवजी शून्य क्षेत्र दाखवते.
3 .ॲप चालू केले असता लोड होत असल्याचे दिसते, मात्र प्रत्यक्षात नोंदणी होत नाही.
4. आदिवासी व दुर्गम भागात नेटवर्क उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांचे ई पीक प्रलंबित राहते.
5.ॲप संदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी हेल्पडेस्कशी संपर्क साधला तरी समस्यांचे निराकरण होत नाही.
निवेदनात पुढे नमूद केले आहे की, अशा तांत्रिक अडचणी तात्काळ सोडविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पावले उचलावीत. तसेच ई पीक पाहणी ची मुदत १४ सप्टेंबरनंतर वाढवावी. शिवाय ग्राम महसूल अधिकाऱ्यांना ( तलाठी ) ऑफलाइन पिक पाहणी नोंदी करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
अन्यथा, या अडचणी न सोडवल्यास महसूल कर्मचारी व शेतकरी वर्गीयांसह आंदोलन छेडण्यात येईल व त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील, असा इशाराही यावल तालुका तलाठी संघाने दिला आहे.