यावल न्युज : हर्षल आंबेकर
अंकलेश्वर ते बुऱ्हाणपूर महामार्गावरील यावल ते फैजपूर दरम्यानचा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असून तात्काळ दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे.
राज्य उपाध्यक्ष (जनहित विधी विभाग) चेतन दिलीप अढळकर यांनी जळगाव येथील भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेशोत्सव काळात रावेर व बुऱ्हाणपूर येथून मोठ्या प्रमाणावर गणपती आणले जातात. मात्र, रस्त्यात ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे आणि दयनीय अवस्थेतील रस्त्यामुळे गणेशभक्तांना तसेच प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्यांमुळे अपघात होण्याचा धोका वाढला असून दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
यावल–चोपडा रस्त्याप्रमाणे यावल–फैजपूर रस्त्याची देखभाल-दुरुस्ती तात्काळ सुरू करण्याचे आदेश ठेकेदाराला द्यावेत, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही अढळकर यांनी दिला आहे.
या निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री रक्षाताई खडसे, रावेर यावल चे आमदार अमोलभाऊ जावळे तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांना सादर करण्यात आली आहे.