चिंचोली गोळीबार प्रकरण हॉटेलमध्ये बिअर न दिल्याने हल्ला : सरपंचासह पाच जणांना अटक

यावल न्युज : 
चिंचोली (ता. यावल) – यावल तालुक्यातील चिंचोली येथील आडगाव फाट्याजवळ बिअर न दिल्याच्या कारणावरून झालेल्या गोळीबार प्रकरणी जिल्हा गुन्हे शाखेने तपासाची चक्रे गतिमान करत पाच संशयितांना अटक केली आहे. या सर्वांना बुधवार, 6 ऑगस्ट रोजी यावल न्यायालयात हजर केले असता 11 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
ही घटना 10 जुलै रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास घडली होती. चिंचोलीजवळील आडगाव फाट्यावरील हॉटेल रायबा येथे दुचाकीवरून आलेल्या दोन जणांपैकी एकाने हॉटेल मालक प्रमोद श्रीराम बाविस्कर (वय 40, रा. पुनगाव, ता. चोपडा) यांच्यावर बिअर न दिल्याच्या कारणावरून थेट गोळ्या झाडल्या होत्या. त्यांना छाती व खांद्यावर गोळ्या लागल्या होत्या. ते त्या वेळी कारमध्ये मित्र रतन वानखेडे (रा. किनगाव) यांच्यासह बसले होते.

या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास जिल्हा गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल यांच्या नेतृत्वात दोन विशेष पथके तयार करण्यात आली होती.

सखोल तपासातून खालील पाच संशयितांना अटक करण्यात आली:

1. किशोर मुरलीधर बाविस्कर (वय 40, सरपंच, रा. पुनगाव, हल्ली मुक्काम कोल्हे हिल्स, जळगाव)


2. दर्शन रवींद्र देशमुख (वय 25, रा. अडावद)


3. गोपाल संतोष चव्हाण (वय 25, रा. अडावद)


4. विनोद वसंतराव पावरा (वय 22, रा. उमर्टी, ता. चोपडा)


5. सुनील सुभाष पावरा (वय 22, रा. उमर्टी, ता. चोपडा)



यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले गावठी पिस्तूल आणि मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी कोणताही प्रत्यक्ष पुरावा नसतानाही तांत्रिक बाबींचा वापर करत गुन्ह्यातील आरोपींमधील संबंध सिद्ध केले. अटक केलेल्यांना बुधवार रोजी प्रथम वर्ग न्यायाधीश जगताप यांच्या समोर हजर करण्यात आले.

दरम्यान, जखमी प्रमोद बाविस्कर यांनी या प्रकरणात पुनगावचे सरपंच किशोर बाविस्कर आणि त्यांचा भाऊ भाजपा अनुसूचित जाती-जमाती युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर यांच्यावर कट रचल्याचा आरोप केला आहे. मात्र त्याबाबत अद्याप पोलिसांकडून कोणतीही अधिकृत कारवाई झालेली नाही.

या कारवाईत गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक सोपान गोरे, शरद बागल, जितेंद्र वलटे, हवालदार प्रीतम पाटील, यशवंत टाकळे, बबन पाटील, रवींद्र माळी, निलेश सोनवणे, मुरलीधर धनगर, प्रदीप सपकाळे, यावल पोलीस ठाण्याचे हवालदार वासुदेव मराठे, जाकीर तडवी यांनी सहभाग घेत तपास पूर्ण केला.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने