यावल पोलिसांची मध्यरात्री कारवाई : दरोड्याच्या तयारीत असलेले चौघे अटकेत, एक फरार

यावल न्युज : 
यावल – यावल पोलिसांनी शिताफीने कारवाई करत चोपडा रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चौघांना मध्यरात्रीच्या सुमारास पकडले. ही कारवाई मंगळवारी, ५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास करण्यात आली. या वेळी एक संशयित अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला असून, पोलिसांनी इरटिका विनाक्रमांकाची कार जप्त केली आहे. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी इंदोर (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई :

यावल पोलिसांना चोपडा रोडवर संशयास्पद वाहन येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे, पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, पोलीस हवालदार सुनील पाटील, वसीम तडवी, अनिल साळुंखे, सचिन पाटील, मंगेश पाटील, ज्ञानेश्वर सपकाळे, अमित तडवी, पुरुषोत्तम पाटील, सागर कोळी, रोहील गळेश यांचा समावेश होता.

विरावली फाट्याजवळ अंधारात थांबलेली कार आढळली

हे पथक चोपडा रस्त्यावर गस्त घालत असताना विरावली फाट्याजवळ अंधारात थांबवलेली विनाक्रमांकाची इरटिका कार निदर्शनास आली. या कारजवळ एकजण रस्त्यावर उभा होता आणि पाळत ठेवत असल्याचे लक्षात येताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत कारमधील चौघांना ताब्यात घेतले. मात्र बाहेर उभा असलेला एकजण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेला. यात 

1. सोहेल मकसूद खान (वय 27, रा. खर्जाना, इंदोर, मध्यप्रदेश)
2. परवेज अब्दुल गणी (वय 35, रा. चंदन नगर, इंदोर, मध्यप्रदेश)
3. इमरान अली शहदाद अली शहा (वय 36, रा. खर्जाना, इंदोर, मध्यप्रदेश)
4. मोहम्मद वसीम मोहम्मद रशीद (वय 34, रा. सरवटे रोड, इंदोर, मध्यप्रदेश)

या चौघांच्या ताब्यातून काळे मास्क, हत्यारे आणि संशयित इरटिका कार जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात बुधवार, ६ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता दरोडा टाकण्याच्या उद्देशाने हत्यार बाळगणे व इतर गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन करत असून फरार संशयिताचा शोध सुरू आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने