रावेर तालुक्यातील ११ वीच्या फी संदर्भात शिवसेनेचे निवेदन

रावेर न्युज नेटवर्क
Raver Education Fees News रावेर तालुक्यातील ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वीच्या प्रवेशावेळी स्वयंअर्थ सहाय्याच्या नावाखाली पालकांकडून वारेमाप फी आकारणी केली जात असल्याच्या तक्रारींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आज पंचायत समिती कार्यालयात गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार प्रवेश न देता काही शाळा प्रशासन व संस्था चालक पालकांना अंधारात ठेवून जादा फी वसूल करत आहेत. यासंदर्भात पालक समितीची बैठक व्यवस्थित न घेता, इतिवृतात सह्या करून घेणे, समितीचा बोर्ड शाळेत न लावणे अशा अनियमितता केल्या जात असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांचा संशय अधिक बळावत असून शिक्षण प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.

यावेळी गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात ११ वी प्रवेशासाठीच्या शासन परिपत्रकाची प्रत, पालक सभेचे इतिवृत, ठराव नोंद व समिती सदस्यांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा विद्यार्थी व पालकांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे.

निवेदन देताना तालुकाप्रमुख अविनाश पाटील, उपतालुकाप्रमुख नितीन महाजन, शहर प्रमुख राकेश घोरपडे, उपशहर प्रमुख संतोष महाजन, मनोज वरणकर, लतीफ शेख यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने