चितोडा ग्रामसभेला सदस्यांची दांडी –ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर

यावल न्युज : किरण तायडे
Chitoda Gramsabha Absent member यावल तालुक्यातील चितोडा येथे ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणारी ग्रामसभा दिनांक १९ रोजी पार पडली. मात्र या सभेला अवघे सरपंच अरुण पाटील, ग्रामसेवक व काही मोजके सदस्यच उपस्थित होते. काही गावकरी उपस्थित असले तरी अनेक सदस्यांनी ग्रामसभेला पाठ फिरविल्याचे दिसून आले.
या ग्रामसभेत सरपंच अरुण पाटील यांनी गावाच्या हिताचे अनेक मुद्दे मांडले. यामध्ये ग्रामपंचायतीचे डिजीटलायझेशन करणे, नरेगा योजनेंतर्गत बांबू लागवड, जलतारा व शोषखड्डे उभारणी यासंबंधीचे निर्णय घेण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या दृष्टीने २ हेक्टरच्या आत केळी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना सबसिडीचा लाभ मिळावा, याबाबत ठराव मांडण्यात आला.

ग्रामस्थांसाठी लेडीज व जेन्ट्स टॉयलेट, शेतरस्ते मोकळे करणे, स्थगित रस्ते पुन्हा सुरू करणे, "Alerto SOS" ग्रामपंचायत अॅपचा वापर, गाव सुरक्षा व आपत्ती व्यवस्थापन यांसह विविध विकासकामांवर चर्चा होऊन आवश्यक निर्णय घेण्यात आले.

मात्र अनेक सदस्य वारंवार ग्रामसभेला अनुपस्थित राहतात. सदस्यच उपस्थित राहत नसतील तर गावाचा विकास कसा होणार? असा सवाल ग्रामस्थांमध्ये होत आहे. नियमानुसार सुरू असलेल्या विकासकामांना अडथळा आणण्यासाठी काही सदस्य हेतुपुरस्सर ग्रामसभेला दांडी मारतात, अशी चर्चा गावात रंगली आहे. त्यामुळे ग्रामस्थांची उपस्थिती वाढविण्यासाठी जनजागृती आवश्यक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

चितोडा ग्रामपंचायतीत गेल्या अनेक वर्षांपासून मनमानी पद्धतीने ग्रामसभा घेतल्या जात असल्याची चर्चा होती. परस्पर गुपचूप निर्णय घेतले जात होते. मात्र मागील अडीच वर्षांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर या कार्यपद्धतीत काही प्रमाणात बदल दिसून येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने