यावल पंचायत समिती आवारातील आदेशावरून संभ्रम. लोकशाही धोक्यात आहे का ? ग्रामस्थांचा प्रश्न

यावल न्युज : हर्षल आंबेकर

यावल – पंचायत समिती आवारात आंदोलनास वा उपोषणास कोणीही बसू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देणारा बोर्ड पंचायत समिती कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे. मात्र या आदेशावर नेमका कोणत्या अधिकार्‍याचा अथवा शासकीय यंत्रणेचा आदेश आहे, याचा कुठलाही उल्लेख नसल्याने तालुक्यातील ग्रामस्थांत संभ्रम निर्माण झाला आहे.

लोकशाहीत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनादत्त अधिकार आहे. मात्र यावल पंचायत समिती आवारात आंदोलनास वा उपोषणास बंदी घालणारा वादग्रस्त बोर्ड लावल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आदेश कोणी काढला, कोणत्या कायद्यान्वये हा इशारा देण्यात आला याबाबत कोणतीही स्पष्टता नसल्यामुळे ग्रामस्थ आता थेट गटविकास अधिकाऱ्यांकडे स्पष्टीकरणाची मागणी करणार आहेत

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, आदेशाची स्पष्ट माहिती न देता फक्त बोर्ड लावणे म्हणजे लोकशाही हक्कांवर गदा आणण्यासारखे आहे. पंचायत समिती कार्यालय हे सार्वजनिक ठिकाण असून तिथे नागरिकांना त्यांच्या मागण्यांसाठी शांततेत लढा देण्याचा अधिकार आहे. मात्र आदेशाचा स्त्रोतच अज्ञात ठेवून ग्रामस्थांवर दबाव आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

यावल तालुका लोकशाहीतून हुकूमशाहीकडे वाटचाल करतो आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. स्थानिक पातळीवर ग्रामस्थ स्पष्ट बोलताना दिसत आहेत की लोकशाही हक्क हिरावून घेण्याचे प्रयत्न होत असतील तर लोकप्रतिनिधींनी त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने