यावल न्युज : हर्षल आंबेकर
यावल तालुक्यातील हिंगोणा गावात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून ग्रामस्थ अक्षरशः हैराण झाले आहेत. दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळेला अचानक वीज खंडित होते व काही वेळाने पुन्हा सुरू होते. अशा प्रकारे वारंवार लाईट ये-जा केल्यामुळे गावातील व्यावसायिक व विद्यार्थी वर्ग मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
सध्या गावात गणपती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असून विजेच्या लपंडावामुळे विविध मंडळांच्या सजावटी, रोषणाई व धार्मिक कार्यक्रमांवर परिणाम होत आहे. नागरिकांसह मंडळातील तरुण मंडळी यामुळे निराशा व्यक्त करत आहेत. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी रात्री विजेची गरज भासते, मात्र लपंडावामुळे त्यांचा अभ्यास खंडित होतो. तसेच वीज उपकरणे, टीव्ही, फ्रिज, पंखे, संगणक यांनाही सतत वीज खंडित झाल्याने नुकसान होण्याची भीती आहे.
ग्रामस्थांनी महावितरणकडे वारंवार तक्रारी केल्या असून तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. “गणपती उत्सवात देखील अंधाराचा सामना करावा लागत असल्याने स्थिर वीजपुरवठा होण्यासाठी तातडीने पावले उचलावीत,” अशी मागणी नागरिकांनी केली आहे.