यावल न्युज :
Sangavi chakradhar Swami avtar din सांगवी बु येथील ज्योती विद्या मंदिर व ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालयात भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामी अवतार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयाचे मुख्याध्यापक आर. एम. भंगाळे व शास्त्री गोपालदादा यांनी चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्याने झाली. या प्रसंगी महानुभाव गुरु शास्त्री गोपालदादा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या प्रवचनातून त्यांनी भगवान चक्रधर स्वामी यांच्या अवतार कार्याची माहिती देत असताना सत्य, अहिंसा व मानवता या जीवनमूल्यांचा संदेश दिला. त्यांनी स्पष्ट केले की सर्वज्ञ चक्रधर स्वामी हे महानुभाव पंथाचे संस्थापक असून त्यांचा जन्म इ.स. 1194 मध्ये गुजरातमधील भरुच येथे झाला. कृष्णभक्तीचा पुरस्कार करत त्यांनी भक्ती व तत्त्वज्ञान यांची सांगड घातली.
स्वामींनी मराठी भाषेतून आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवले आणि त्यामुळे मराठी भाषेला धर्मातील स्थान प्राप्त झाले. त्यांनी ‘द्वैत तत्त्वज्ञान’ मांडत आत्मा व परमात्मा या दोन तत्त्वांवर भर दिला. त्यांच्या शिष्यांनी हे तत्त्वज्ञान महाराष्ट्रभर पोहोचवले. त्यांच्या कार्याचा व शिकवणीचा महत्त्वपूर्ण ग्रंथ म्हणजे ‘लीळाचरित्र’ होय, अशी माहिती त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षीका मनीषा भटकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन पंकज भंगाळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी बंधूभगिनींनी परिश्रम घेतले.