जळगाव : यावल न्युज ।
Banana tissue culture plantlet production center in Hingona village soon जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! भारतीय बीज सहकारी समिती लिमिटेड (BBSSL) यांनी यावल तालुक्यातील हिंगोणा (गट नं. 224) येथे बनाना टिश्यू कल्चर प्लांटलेट उत्पादन केंद्र स्थापन करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे सादर केला आहे. सुमारे 20 हेक्टर (50 एकर) शासकीय जागा दीर्घकालीन भाडेपट्ट्यावर उपलब्ध करून देण्याची विनंती करण्यात आली आहे.
या केंद्राद्वारे दरवर्षी 5 ते 6 दशलक्ष उच्च दर्जाचे, रोगमुक्त व जास्त उत्पादन देणारे केळी रोपे तयार केली जाणार असून, पुढील 3 ते 4 वर्षांत उत्पादन क्षमता 40 ते 50 दशलक्ष रोपांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. यामुळे पिकाची गुणवत्ता सुधारेल, रोगप्रसारात घट येईल तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न लक्षणीय वाढेल.
या प्रकल्पामुळे ग्रामीण युवकांसाठी जैवतंत्रज्ञान व नर्सरी व्यवस्थापन क्षेत्रात रोजगार निर्मिती होणार आहे. ‘जळगाव केळी’ला असलेला GI-टॅग लक्षात घेता, उच्च दर्जाच्या रोपांच्या निर्मितीमुळे निर्यात क्षमताही वाढणार आहे. सहकाराच्या माध्यमातून आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार हा या प्रकल्पाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू असेल.
या उपक्रमासाठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांनी विशेष पाठपुरावा केला असून, प्रस्ताव तयार करण्यासाठी DPPMU कक्षातील अमोल जुमडे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
हा प्रकल्प राबवल्यानंतर जिल्ह्यातील शेतकरी, उद्योजक व कृषी क्षेत्राशी संबंधित व्यवसायांना मोठा आर्थिक व तांत्रिक लाभ मिळणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या केळी उद्योगासाठी हे नवे युग ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.