सांगवी ज्योती विद्या मंदीर येथे वृक्षदिंडी उत्साहात साजरी : विद्यार्थ्यांनी साकारल्या संतांची वेषभूषा, पर्यावरण रक्षणाचा घेतला संदेश

यावल न्युज : किरण तायडे
यावल तालुक्यातील सांगवी ज्योती विद्या मंदिर येथे शनिवार, दिनांक ५ जुलै २०२५ रोजी वृक्षदिंडी उत्साहात साजरी करण्यात आली. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात शाळेतील विद्यार्थी, शिक्षक आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी वृक्षदिंडीचे पूजन शाळेचे मुख्याध्यापक आर. एम. भंगाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी वृक्षदिंडीचे पर्यावरणातील महत्त्व विशद केले. "एक पेड माँ के नाम" या केंद्र शासनाच्या अभियानाची माहिती शिक्षक पी. एम. भंगाळे  यांनी दिली. त्यांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची गरज अधोरेखित करत विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाबाबत जागृती निर्माण केली.
या वृक्षदिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी, संत तुकाराम, संत मुक्ताई, वारकरी आणि टाळकरी यांच्या वेषभूषा साकारून उपस्थितांची मने जिंकली. दिंडी गावात प्रवेश करताच महिला भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्ष व दिंडीचे पूजन केले.
या उपक्रमात ज्योती प्राथमिक विद्या मंदिर, ज्योती विद्या मंदिर तसेच ज्ञानपीठ प्राप्त पद्मश्री डॉ. भालचंद्र नेमाडे कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी देखील सक्रिय सहभाग नोंदवला.

पर्यावरण जपण्याचा संदेश देणारी ही वृक्षदिंडी विद्यार्थ्यांमध्ये चिरकाल टिकणारा संस्कार रुजवणारी ठरली.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने