यावल न्युज : किरण तायडे
चितोडे ता. यावल आज दिनांक ५ जुलै २०२५ रोजी आषाढी एकादशीनिमित्त जिल्हा परिषद शाळा चितोडे येथील विद्यार्थ्यांच्या वतीने गावातील विठ्ठल मंदिरापर्यंत हरिनामाच्या जयघोषात पायी वारीचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करत टाळ-मृदुंगाच्या गजरात, “राम कृष्ण हरि” च्या जयघोषात संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
या पायी वारीला गावातील ग्रामपंचायतीकडून व ग्रामस्थांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. वारीदरम्यान विद्यार्थ्यांना विविध ठिकाणी दूध, बिस्किटे, चॉकलेट यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमात सरपंच अरुण पाटील, उपसरपंच गोलू धांडे, ग्रामपंचायत सदस्य चंदू जंगले, राधिका वारके, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विशाल भंगाळे, मुख्याध्यापिका कुंदा गाजरे, उपशिक्षिका अर्चना कोल्हे, युवा प्रशिक्षणार्थी चेतन राणे यांच्यासह पालक आणि गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
या भक्तिमय वारीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये भक्तीभावाची बीजे रोवली गेली असून, पारंपरिक वारकरी संस्कृतीची जपणूक करण्यात आली. गावात या वारीमुळे उत्साहाचे व भक्तिभावाचे वातावरण निर्माण झाले होते.