यावल न्युज :
रावेर तालुक्यातील खिरोदा येथील जनता शिक्षण मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयातील मुख्याध्यापिका आणि कनिष्ठ लिपिकाला ३६ हजार रुपयांची लाच घेताना आज सोमवार, ७ जुलै २०२५ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहात अटक केली. ही धक्कादायक कारवाई शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडवणारी ठरली आहे.
महाविद्यालयातील महिला उपशिक्षिकेच्या प्रसूती रजेची मंजुरी देण्यासाठी लाच मागितल्याची तक्रार एक ६१ वर्षीय सेवानिवृत्त मुख्याध्यापकाने दाखल केली होती. ते याच संस्थेतून निवृत्त झाले असून, त्यांच्या सुनेची प्रसूती रजा मंजूर करून देण्यासाठी मुख्याध्यापिका मनीषा पितांबर महाजन (वय ५७, रा. चिनावल रोड, खिरोदा) यांनी प्रतिमहिना ६ हजार रुपये प्रमाणे, सहा महिन्यांसाठी एकूण ३६ हजार रुपयांची लाच मागितली होती.
त्यानुसार, तक्रारदाराने दिनांक ७ जुलै रोजी महिला मुख्याध्यापिकेला लाच देताना पंचासमक्ष एसीबी पथकाने सापळा रचून कारवाई केली. लाच स्वीकारल्यानंतर कनिष्ठ लिपिक आशिष यशवंत पाटील (वय २७, रा. उदळी, ता. रावेर) यांनी ते पैसे मोजले. त्यानंतर एसीबीने दोघांनाही अटक केली.
ही कारवाई पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. दोघांविरोधात सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
या प्रकारामुळे रावेर व यावल तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ निर्माण झाली आहे.