यावल न्युज
यावल तालुक्यातील आमोदा गावाजवळ अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. रविवारी दिनांक ६ जुलै रोजी सकाळी प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात उलटल्याची मोठी दुर्घटना घडल्यानंतर, रात्री पुन्हा साडेनऊ वाजेच्या सुमारास दुचाकी अपघात घडला.
या अपघातात दोन दुचाकींमध्ये समोरासमोर धडक झाली असून, दोन युवक जखमी झाले आहेत. त्यापैकी एका युवकाची प्रकृती गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बजाज प्लेटिना (क्रमांक एम एच 19 डीजे 4425) ही दुचाकी फैजपूर वरून बामणोदकडे जात असताना, समोरून येणाऱ्या दुचाकीशी आमोदा गावाजवळ धडकली.
या अपघातात जमील तडवी (रा. फैजपूर) हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दुसरा युवक कल्पेश महाजन (रा. बामणोद) यालाही फैजपूरमधील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अामोदा परिसरात सातत्याने होणाऱ्या अपघातांमुळे ग्रामस्थांमध्ये चिंता वाढली आहे. या ठिकाणी वाहतुकीच्या सुरक्षिततेसंदर्भात तातडीने उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याचे स्थानिकांकडून जोरदारपणे सांगितले जात आहे.