मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना यावलचे गटविकास अधिकारी करीत आहेत जळगावहून अपडाऊन; शासन नियमांचा भंग?

यावल न्युज
 यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे शासनाच्या स्पष्ट आदेशांनुसार मुख्यालयी राहणे बंधनकारक असतानाही जळगाव येथून यावल येथे दररोज अपडाऊन करत असल्याचे उघडकीस आले असून, त्यामुळे शासन नियमांची पायमल्ली होत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यात सुरू आहे.
ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत ग्रामीण भागात शासकीय योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी व नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी गटविकास अधिकारी हे तालुका मुख्यालयी स्थायिक असणे आवश्यक आहे. मात्र, यावल येथील गटविकास अधिकारी मुख्यालयी न राहता जळगाव येथूनच दररोज ये-जा करीत असल्याने कामकाजावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

ग्रामविकास योजनांचे प्रभावी अंमलबजावणी, ग्रामीण भागातील समस्या, नागरिकांची तक्रारी व तातडीची शासकीय प्रक्रिया यावर त्वरित निर्णय घेणे अपेक्षित असताना मुख्यालयी अनुपस्थितीमुळे या जबाबदाऱ्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. विशेषतः कर्मचारीवर्ग आणि अन्य विभागीय अधिकारीही याच पद्धतीने अपडाऊन करत असल्याने पंचायत समितीचे शासकीय व्यवहार शिथिल होत असल्याचे चित्र आहे.

ही बाब शासनाच्या धोरणाविरोधात असून, त्यामुळे ग्रामीण भागात राबविण्यात येणाऱ्या कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व नागरिकांचे हित साधणे धोक्यात येत आहे. यावल तालुक्याच्या विकासात अडथळा निर्माण करणाऱ्या या प्रकाराची तपासणी करून संबंधित गटविकास अधिकाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जळगाव यांनी या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी आता पुढे येत आहे.


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने