शेतकरी कर्जमाफीसाठी यावल येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे 24 जुलै रोजी चक्काजाम आंदोलन

यावल न्युज
 शेतकरी कर्जमाफी व इतर महत्त्वाच्या मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेतर्फे यावल शहरात दिनांक 24 जुलै 2025 रोजी भुसावळ टी पॉईंट येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनासंदर्भात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, पोलीस निरीक्षक व संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, माजी आमदार बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू असून, त्याच आंदोलनाचा एक भाग म्हणून यावल येथेही तीव्र स्वरूपात चक्काजाम आंदोलन होणार आहे. यामध्ये शेतकरी, कष्टकरी, दिव्यांग, विधवा, मेंढपाळ, ग्रामपंचायत कर्मचारी अशा वंचित घटकांच्या प्रश्नांवर ठोस कार्यवाही व्हावी, अशी संघटनेची आग्रही मागणी आहे.

संघटनेने म्हटले आहे की, या मागण्या केवळ राजकीय नसून सामाजिक न्यायाशी निगडित आहेत. शासनाने जर या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन उफाळून येईल आणि त्यास सरकार जबाबदार राहील, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदन देताना यावल तालुका अध्यक्ष हरिभाऊ विजय पाटील, ललित पाटील (दहिगाव), दिलीपभाऊ आमोदेकर, प्रतीक पाटील (नायगाव), लोटन जयकर (दहिगाव), बंटी पाटील, पवन पाटील, समाधान पाटील, किरण माळी, निंबाजी पाटील, हरिलाल अलकरी (शिरसाड), समाधान डुबोले (यावल), रामदास पाटील (कठोरा), कमलाकर झोपे, बाळू रावजी, यादव राणे, खेमा बेंडाळे, घनश्याम फिरके (बामणोद), ललित फिरके, नाना विरवली, संतोष पाटील (असनखेडा), रेखा चौधरी (यावल), मीना देशमुख इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावलमध्ये होणाऱ्या या चक्काजाम आंदोलनाकडे प्रशासन व सरकारने गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे, अन्यथा आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता संघटनेने व्यक्त केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने