जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी व खाजगी व्यक्ती लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

यावल न्युजः जळगाव | 23 जुलै 2025 
जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखेमधील सहाय्यक महसूल अधिकारी आणि एक खाजगी व्यक्तीला लाच घेताना अटक करण्यात आली असून, या कारवाईने महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली आहे.
तक्रारदाराने दिनांक 16 जून 2025 रोजी त्यांच्या गावातील ग्रामपंचायत सदस्यांविरोधात दाखल अतिक्रमण प्रकरणाच्या कागदपत्रांच्या प्रती मिळवण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज केला होता. यानंतर तक्रारदार वारंवार कार्यालयात भेट देत असताना सहाय्यक महसूल अधिकारी प्रशांत सुभाष ठाकूर आणि खाजगी व्यक्ती संजय प्रभाकर दलाल यांनी कागदपत्रांच्या प्रती देण्यासाठी 2,000 रुपयांची लाच मागितली होती.

त्यानुसार तक्रारदाराने 23 जुलै रोजी जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. पडताळणीत ही लाच मागणी सत्य असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एसीबीने सापळा रचला. त्यामध्ये संजय दलाल यांनी "शासकीय फी व झेरॉक्सचे 880 रुपये आणि 1120 रुपये" असे सांगत एकूण दोन हजार रुपये लाच स्वीकारली. ही रक्कम प्रशांत ठाकूर यांच्या सांगण्यावरून स्वीकारण्यात आल्याचेही निष्पन्न झाले.

या प्रकरणी प्रशांत सुभाष ठाकूर (वय 49, धंदा – नोकरी, सहाय्यक महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव, अभिलेख शाखा, वर्ग-3) व संजय प्रभाकर दलाल (वय 58, धंदा – खाजगी नोकरी, रा. शिव कॉलनी, जळगाव) यांना रंगेहात पकडण्यात आले असून, त्यांच्यावर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन, जळगाव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पुढील अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली:

श्री. योगेश ठाकूर – पोलीस उपअधीक्षक, एसीबी, जळगाव (पर्यवेक्षण अधिकारी)
श्रीमती स्मिता नवघरे – पोलीस निरीक्षक, एसीबी, जळगाव (सापळा व तपास अधिकारी)
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील
पोलीस नाईक बाळू मराठे
पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी


या प्रकरणामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, लाचखोरीविरोधात अधिक कठोर पावले उचलण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने