यावल न्युज
यावल तालुक्यातील प्रभात विद्यालय, हिंगोणे येथे होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी शिक्षक सिद्धेश्वर लिलाधर वाघुळदे (संचालक, जळगाव जिल्हा माध्यमिक पतपेढी, जळगाव) यांच्या पुढाकाराने राबविण्यात येणाऱ्या शैक्षणिक पालकत्व योजनेतून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
गेल्या शैक्षणिक वर्षापासून सुरू असलेल्या या योजनेत यंदा कुमारी मेघा सुभाष आदीवाले, वैभव गौतम कोचुरे, जीवन विठ्ठल मोरे, आलिया शरीफ तडवी व वैष्णवी विजय सोनवणे या पाच होतकरू विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक व शालेय उपयुक्त वस्तूंचे वाटप वाघुळदे सरांच्या वतीने करण्यात आले.
या उपक्रमावेळी शाळेचे मुख्याध्यापक मनोज गाजरे, पर्यवेक्षिका
सुजाता बोरोले, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या स्तुत्य उपक्रमाबद्दल सिद्धेश्वर वाघुळदे सरांचे संपूर्ण पंचक्रोशीतून कौतुक करण्यात येत असून, त्यांच्या सामाजिक भान आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची चर्चा परिसरात विशेष झाली आहे.