यावल न्युज
यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे शिल्पकार स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महसूल, पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कृषिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गावाचे सरपंच मा. नवाज तडवी यांनी भूषविले
या कार्यक्रमासाठी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या समवेत गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड, तालुका कृषी अधिकारी भरत वारे, कृषी वैज्ञानिक अतुल पाटील(सातपुडा कृषी तंत्रज्ञान केंद्र, पाल) , सागर महाजन (सहकार तालुका अध्यक्ष) आणि माजी पंचायत समिती उपसभापती शेखर पाटील यांचीही विशेष उपस्थिती लाभली. गावचे उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच शेतकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी झाले.
तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी कृषी विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले असलेने, त्यांनी बदलत्या हवामानातील शेती, कीड-रोग नियंत्रण, उत्पादनवाढीसाठी तंत्रज्ञान व वैज्ञानिक शेती याविषयी सखोल मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले व आधुनिक शेती आत्मविश्वासाने वाटचाल करण्याची प्रेरणा मिळाली
गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड मॅडम यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे महत्त्व, नैसर्गिक घटकांचा योग्य वापर व दीर्घकालीन जमिनीच्या आरोग्याचे फायदे यावर सविस्तर आणि प्रभावी मार्गदर्शन केले.
कृषी वैज्ञानिक श्री.अतुल पाटील यांनी जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी माती परीक्षणाचे महत्त्व, सेंद्रिय व सेंद्रियेतर घटकांचा वापर, तंत्रशुद्ध शेती व पाण्याचे व्यवस्थापन यावर योग्य मार्गदर्शन दिले.
सूत्रसंचालन चौधरी साहेब यांनी प्रभावीपणे पार पाडले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले. महसूल विभाग, पंचायत समिती व कृषी विभाग यांच्या समन्वयातून राबवलेल्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारी माहिती मिळाली असून, शाश्वत, आधुनिक व वैज्ञानिक शेतीकडे वाटचाल करण्यास प्रोत्साहन मिळाले.