यावल न्युज
यावल तालुक्यातील सावखेडा सीमजवळील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरणात रविवारी सायंकाळी बुडून बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल तीन दिवसांनंतर, मंगळवार दिनांक 1 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता आढळून आला. मृत तरुण जतीन अतुल वार्डे (वय 18, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) याचा मृतदेह पावसाच्या संततधारीत पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आला असून, शवविच्छेदनासाठी यावल ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
रविवारी सुट्टीच्या दिवशी जळगाव येथून काही तरुण निंबादेवी धरण परिसरात मौजमजा करण्यासाठी आले होते. संध्याकाळी सुमारास जतीन वार्डे खोल पाण्यात गेला आणि त्यानंतर तो दिसेनासा झाला. तात्काळ शोध घेण्यात आला मात्र त्याचा काहीच ठावठिकाणा लागत नव्हता.
सोमवार पासून यावल पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार वासुदेव मराठी, सुनील पाटील, हर्षद गवळी, मुकेश पाटील, अमित तडवी, संतोष पाटील, तसेच पोलीस पाटील पंकज बडगुजर यांनी घटनास्थळी तळ ठोकत शोधमोहीम राबवली. स्थानिक नागरिक व मारुळ येथील एका अनुभवी वृद्धानेही शोध मोहिमेत महत्त्वपूर्ण सहभाग घेतला. सोमवारी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी घटनास्थळी भेट देत आपत्ती व्यवस्थापनाच्या धुळे येथील पथकाला पाचारण केले होते.
मंगळवारी सकाळी मृतदेह आढळून आला असून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे