यावल न्युज
तालुक्यातील डोंगरकठोरा येथे महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ दिनांक २ जून २०२५ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर श्री खंडेराव महाराज मंदिर ट्रस्ट सभागृहात भरवले जाणार असून, नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि योजनांचा लाभ एका छत्राखाली मिळणार आहे.
यावल रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेनुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे समस्या संकलन -कार्यवाही -व समाधान या तीन टप्प्यात राबविण्यात यावेत असे निर्देश दिले होते त्या अनुषंगाने दिनांक 21 एप्रिल ते 30 मे 2025 या कालावधीत सर्व विभागांनी लेखी व तोंडी प्राप्त समस्यांचे संकलन करून त्यावर कार्यवाही केली आहे.त्याचप्रमाणे उद्या होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरात प्राप्त होणाऱ्या तक्रारी व समस्यांचे तात्काळ समाधान करण्याचे निर्देश आमदार अमोल जावळे यांनी सर्व विभागांना दिलेले आहेत.
या शिबिरात महसूल, कृषी, सामाजिक न्याय, पुरवठा, आरोग्य, जलसंधारण, महिला व बालकल्याण, ग्रामविकास, रोजगार हमी, निवडणूक, बँकिंग, पाणीपुरवठा, जमीन अभिलेख, माहिती तंत्रज्ञान आदी विभागांच्या सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत.
शिबिराद्वारे नागरिकांना घरबसल्या सेवा मिळाव्यात यासाठी उपविभागीय अधिकारी बबन काकडे, तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, महिला, युवक-युवती आणि ग्रामस्थांनी या शिबिरात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.