यावल न्यूज
हिंगोणा (ता. यावल) येथील पवन दुर्गोत्सव मंडळाच्या वतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 300 वी जयंती अत्यंत उत्साहात व श्रध्देने साजरी करण्यात आली. या निमित्ताने मंडळ परिसरात आयोजित कार्यक्रमात राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सदर प्रतिमेचे पूजन हिंगोणा ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सारिका किशोर सावळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती उपस्थितांना दिली व त्यांच्या समाजसेवेच्या कार्यावर प्रकाश टाकला. अहिल्याबाईंचे जीवन हे कर्तृत्व, साधुता व आदर्श नेतृत्वाचे प्रतीक आहे असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांमध्ये सागर महाजन, संतोष सावळे, मनोज वायकोळे, किशोर सावळे, भरत पाटील, किरण पाटील, मंगल पाटील, प्रणव राजपूत, विकास सावळे, बबलू सावळे यांच्यासह गावातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते. उपस्थितांनी अहिल्याबाईंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला त्यांना आदरांजली अर्पण केली.
राजमाता अहिल्याबाई होळकर यांचे समाजातील योगदान व त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी केलेले कार्य हे आजच्या काळात प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचे पालन करून आपण समाजात सकारात्मक बदल घडवू शकतो, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पवन दुर्गोत्सव मंडळातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.