यावल न्युज
यावल नगर परिषदेचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष शशांकदादा प्रभाकर देशपांडे (वय ६४) यांचे आज, दिनांक ३१ मे २०२५ रोजी पहाटे ४ वाजता, अल्पशा आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे यावल शहरावर शोककळा पसरली आहे.
शशांकदादा यांची अंत्ययात्रा आज दुपारी ३ वाजता त्यांच्या कोर्ट रोड, नगर परिषद मार्गावरील निवासस्थानाहून निघणार आहे.
सन २००१ मध्ये शशांकदादा यांची यावल नगर परिषदेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांच्या कार्यकाळात शहरातील गंभीर पाणीपुरवठा प्रश्न मार्गी लागला होता. तसेच यावल नगर परिषदेची नवी सुसज्ज इमारतही त्यांच्या नेतृत्वात उभारण्यात आली होती. त्यामुळे त्यांना यावल नगरीचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते.
त्यांच्या पश्चात भाऊ, सून, नातवंडे असा परिवार असून, ते निरामय हॉस्पिटलचे संचालक डॉ. शंतनू देशपांडे यांचे काका होते.
शशांकदादांच्या निधनाने यावल शहराने एक दूरदृष्टीचा, कर्तबगार आणि कार्यक्षम नेतृत्व गमावले आहे.