यावल न्युज
यावल तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा तसेच खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये उद्या १६ जून २०२५ रोजी शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला जाणार आहे. नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी तालुक्यातील सर्व शाळांनी जय्यत तयारी केली असून, हा उत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरणार आहे.
पहिल्याच दिवशी इयत्ता पहिलीतील नव्याने दाखल झालेल्या मुलांसाठी बैलगाडी, ट्रॅक्टर, घोडागाडी व इतर पारंपरिक वाहनांवरून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे. त्यानंतर शाळेत आगमन होताच सर्व नवागत बालकांचे स्वागत माननीय खासदार, आमदार, विविध सन्माननीय पदाधिकारी, तसेच जिल्हा व तालुका स्तरावरील अधिकारी यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन करण्यात येणार आहे.
शाळांच्या दर्शनी भागात व प्रवेशद्वाराजवळ स्वागतासाठी बॅनर, रंगीबेरंगी रांगोळी, पानाफुलांची सजावट करण्यात येणार असून वातावरण उत्साहवर्धक राहणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश, बूट आणि मोजे यांचे वाटप करण्यात येईल. शालेय पोषण आहारासोबत गोड अन्नपदार्थांचाही विशेष बेत ठेवण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रमुख पाहुण्यांकडून उपस्थित विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येईल.
या प्रवेशोत्सवाला यशस्वी करण्यासाठी यावल पंचायत समिती शिक्षण विभागाच्यावतीने गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी विशेष आवाहन केले आहे की, सर्व पालकांनी आपल्या पाल्यांसोबत सकाळी आठ वाजता शाळेत उपस्थित राहावे व हा आनंददायी क्षण साजरा करावा.
शाळा प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने यावल तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा सहभाग हेच या उपक्रमाचे खरे यश ठरणार आहे.