यावल न्युज
सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय, यावल येथे नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26 च्या प्रारंभानिमित्त विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्याला संस्थेचे अध्यक्ष अरुण कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीकांत सराफ तसेच व्यास प्रासादिक एज्युकेशन सोसायटीचे संचालक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्याध्यापक प्रा. एस. एम. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण विद्यालय सुंदररित्या सजवण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे फुलांच्या स्वागताने, बँड पथकाच्या साथीने आणि आनंदमय वातावरणात आगमन झाले. विद्यार्थ्यांबरोबरच त्यांच्या पालकांचाही यथोचित सन्मान करून कार्यक्रमाला वैभव प्राप्त झाले.
विशेषतः संस्थेचे उपाध्यक्ष श्रीकांत सराफ यांनी उपस्थित राहून शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापकांनी प्रथमच दिवशी शिक्षकांचे स्वागत करून एकतेचे प्रतीक उभे केले. शालेय व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला.
विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली आणि नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. नरेंद्र महाले यांनी तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षक एन. डी. भारुडे यांनी केले.
या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. प्रवेशोत्सवाने संपूर्ण शाळा परिसर उत्साही वातावरणाने भरून गेला.