यावल तालुक्यात राजकीय भूकंपाची शक्यता; पक्षांतराच्या चर्चांना उधाण

यावल न्युज
 येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कालखंड डोळ्यासमोर ठेवून यावल तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या तालुक्यातील राजकीय वर्तुळात पक्षांतराच्या चर्चेला चांगलाच जोर आला असून अनेक महत्त्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष बदलण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे.
गेल्या काही दिवसांपासून काही प्रमुख राजकीय नेते आपल्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांना थेट फोन करून पक्षांतर करण्याचे संकेत देत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण अधिकच तापले असून यावल तालुक्यात “राजकीय भूकंप” होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.

जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपालिका निवडणुका लक्षात घेता हे पक्षांतर नियोजित स्वरूपात होत असल्याचे जाणकार सांगतात. काही ठिकाणी जुने पक्षकार्यकर्ते नाराज असून त्यांच्याच नाराजीचा फायदा घेत इतर पक्ष त्यांना आपल्या गोटात खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.परंतु आयत्या वेळी येत असलेल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना स्थानिक पुढाऱ्यांचा विरोध होत असल्याचे देखील चर्चा आहे.

सध्या तरी कोणते नेते, कोणते कार्यकर्ते, कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट झाले नसले तरी येणाऱ्या काही दिवसांत या संदर्भात मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावल तालुक्यात प्रत्येक राजकीय गोटात तर्क-वितर्कांना उधाण आले असून चर्चा चांगलीच रंगली आहे.

येणाऱ्या काळात कोण कोणत्या पक्षात प्रवेश करतो, कोण बाहेर पडतो, आणि याचा राजकीय गणितावर काय परिणाम होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने